अमळनेर (प्रतिनिधी) पतीच्या अकाली मृत्यूनंतर एका महिलेवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच घात करत महिलेच्या ९ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार जळगावच्या अमळनेर तालुक्यातून समोर आला आहे.
मध्य प्रदेशातील एका महिलेचा ती अल्पवयीन असतानाच विवाह झाला होता. बांधकाम मजूर म्हणून ते दोघं जण भुसावळात राहत होते. त्यांना एक मुलगी देखील झाली. परंतु महिलेच्या पतीचे दारूच्या व्यसनामुळे पाच वर्षापूर्वी निधन झाले. त्यानंतर महिलेच्या नशिबाची फरफट सुरु झाली. पतीच्या निधानावेळी महिला गर्भवती होती. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी महिलेने रेल्वेत भिक मागायला सुरुवात केली. आपल्या दोघं मुलांसोबत रेल्वेत भिक मागून आपला उदरनिर्वाह करताना महिलेची रेल्वेत ओळख रवींद्र रणछोड पारधी (वय २५) यांच्या सोबत झाली. महिलेलाही स्वत:सह मुलांसाठी आधारची गरज असल्यामुळे तिने रवींद्र सोबत अमळनेर तालुक्यातील एका गावात राहण्याचा निर्णय घेतला. दोघं जण मर्जीने एका झोपडीत सोबत राहू लागले. मात्र, मागील ४/५ महिन्यापासून रवींद्रला दारूचे व्यसन जडले. तो महिलेला मारहाण करून रेल्वेत भिक मागायला पाठवू लागला.
बुधवारी मात्र, महिला घरी आल्यावर तिच्यासमोर धक्कादायक चित्र उभे राहिले. रवींद्र हा ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करत होता. आईला बघताच चिमुकली ढसाढसा रडायला लागली आणि मागील चार पाच महिन्यापासून जीवेठार मारण्याची धमकी देत रवींद्र कडून हा प्रकार सुरु असल्याचे सांगितले. यानंतरही रवींद्रची दादागिरी काही कमी होत नव्हती. तो पिडीत मुलीला व तिच्या आईला घराबाहेर निघू देत नव्हता. परंतु दोघांनी अखेर मारवड पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रवींद्र पारधी विरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी रवींद्र पारधीला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.