जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत शिक्षणमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशेष आवाहन केले आहे.
पालकमंत्री म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा महत्वाचा आधारस्तंभ आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जातील, यासाठी जिल्हा प्रशासन त्यांच्या सोबत आहे. भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.”
विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करावे, असे सांगत पालकमंत्री पाटील यांनी शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांना सकारात्मक मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.
याशिवाय, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. राज्यात कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
“महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे शिक्षणाला पुढे नेऊया,” असे आवाहन करत पालकमंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.