जळगाव (प्रतिनिधी) दुकान बंद करुन प्रवर्तन चौकात उभ्या असलेल्या पितापुत्राला दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी चाकूने वार करुन लुटल्याची घटना दि. १९ रोजी घडली होती. यावेळी दरोडेखोरांना विरोध केला असता, त्यांच्यावर एकाने गोळीबार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता.
दरम्यान, तांत्रिक विश्लेषणावरुन एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने या गुन्ह्याची उकल करीत, भुसावळ येथील पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले. अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकाजवळ रविंद्र रमेश खेवलकर हे दि. १९ रोजी आपले दुकान बंद करून बाहेर वडील आणि भावासोबत उभे होते. लक्ष्मीनारायण प्रोव्हिजन दुकानासमोरील फिर्यादी यांचे पानटपरीजवळ उभे असताना दोन दुचाकीवरुन चार दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले. त्यांनी तरुणावर चाकूने वार करुन त्यांच्या हातातील पिशवीतून दहा हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून ते तेथून पसार झाले होते. हा प्रकार तरुणाच्या लक्षात येताच त्याने घटनास्थळी धाव घेतली असता, दरोडेखोर आणि त्यांच्यामध्ये झटापट झाल्याने दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये मंगेश खेवलकर हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, ही घटना भरचौकात असलेल्या सट्टापेढीवर झाल्याची चर्चा देखील शहरात सुरु होती. या घटनेमुळे पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एलसीबीसह मुक्ताईनगर पोलिसांची संयुक्त कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकातील सपोनि राजेंद्र चाटे, सपोनि जयेश पाटील, एलसीबीचे पोउपनिरी शरद बागल, पोहेकॉ कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन पोळ, महेश सोमवंश पोना महेंद्र सुरवाडे, पोना सुरेश मेढे, पोकॉ गोविंदा पवार, सुनिल मोरे यांच्या पथकाने केली.
गावठी कट्टूयासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त !
अटकेतील संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा, ४ मोबाईल फोन, बुलेट, एक दुचाकी तसेच तरुणाकडून हिसकावलेले १० हजार रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यात गोळीबाराचे वाढीव कलम लावून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली