जळगाव (प्रतिनिधी) रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींमधील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.आज राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर हा उत्सव सर्वदूर उत्साहात साजरा झाला. आजच्या दिवशी बहीण लाडक्या भाऊरायाला राखी बांधते आणि भाऊदेखील बहिणीसाठी वेळप्रसंगी कोणताही त्याग करण्यासाठी तयार असल्याचे वचन बहिणीला देतो.पण जळगाव मधील एका भावाने आपल्या लाडक्या दोन्ही बहिणींना हेल्मेटची भेट देत त्यांची काळजी असल्याचा जिव्हाळा घट्ट तर केलाच पण पण नवीन पायंडा समाजासमोर ठेवला आहे.
जळगावमधील ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे यांच्या दोन मुली आणि मुलगा पुण्यात कोथरूड भागात शिक्षणानिमित्त राहतात. मोठी मुलगी धनश्री ही पुणे विद्यापीठात एमएसस्सी बॉटनीच्या फायनल वर्षाला तर दुसरी मुलगी भाग्यश्री अग्रीकल्चर बिसिनेस मॅनेजमेंटच्या तिसऱ्या वर्षाला आकुर्डी येथे शिकतात. या दोन्हीचा भाऊ गौरव हा सुद्धा लोहगाव येथे पॉलिटेक्निक करतोय. धनश्री व भाग्यश्री रोज कोथरूड मधुन शिक्षणासाठी दुचाकीने जातात. गौरव हा वयाने सज्ञान नसल्याने वाहन परवान्याअभावी मात्र पीएमटी बसने प्रवास करतो.
पुण्यातील वाहतुकीची वाढती समस्या आणि अपघाताचे चित्र पाहता काळजीतुन आपल्या दोन्ही बहिणी लांबवर प्रवास करतांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गौरवने वेगळा निर्णय घेत आपल्या दररोज घरून भेटणाऱ्या खर्चात बचत करत दोन्हीना राखी बांधल्यावर रक्षाबंधनची भेट म्हणून हेल्मेट ताटात दिले. आजच्या पाश्चात संस्कृतीत चॉकलेट आणि मोमोजची अपेक्षा करणाऱ्या या बहिणींनी जेव्हा गिफ्ट बॉक्स मध्ये ही भेट पाहिली तर त्यांच्या दोघांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू दाटून आले.समाजाला अपघाताच्या मालिकेतून वाचवण्यासाठी पोलीस व परिवहन विभाग हेल्मेट सक्ती मोहीम राबवित असतांना आज गौरव ठाकरे याने रक्षाबंधन निमित्त अनोख्या पद्धतीने आपल्या बहिणींना सुरक्षेच्या दृष्टीने आगळी वेगळी भेट म्हणून हेल्मेट देणे एक आदर्श पण बहीण-भावातील जिव्हाळा दर्शवणारे वेगळेच उदाहरण म्हटले पाहिजे.