गडचिरोली (वृत्तसंस्था) एका रानटी हत्तीने कर्तव्यावर असलेल्या वनविभागाच्या वाहनचालकास तुडवून ठार केल्याची घटना शनिवार, १६ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास देसाईगंज-आरमोरी वनपरिक्षेत्रांच्या सीमेवरील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर घडली. सुधाकर बाबुराव आत्राम (४५) असे ठार झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे.
ओडिसातून छत्तीसगड मार्गे हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरुमगाव परिसरात प्रवेश केला. याच हत्तींच्या कळपाने मागील काही दिवसांपासून देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. या हत्तींनी कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा तालुक्यातील धानपिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. काल रात्री या हत्तींनी आरमोरी तालुक्यातील शंकरनगर पाथरगोटा गावांमधील पिकाचे नुकसान केले. त्यानंतर शनिवारी दुपारी हत्तींचा कळप पळसगाव डोंगरगाव रस्त्यावर आला होता.
या हत्तींनी नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंचनाम्यासाठी सहायक वनसंरक्षक संदीप भारती, आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल, वनरक्षक व वनमजूर घटनास्थळाकडे वाहनांनी गेले होते. वाहनातून उतरल्यानंतर वाहनचालक सुधाकर आत्राम हे हत्तीचे व्हीडिओ काढत होते. एवढ्यात एक हत्ती त्यांच्या मागे धावला, त्याने आत्राम यांना सोंडेने उचलून पायाखाली तुडवून ठार केल्याचे सांगितले जात आहे. आत्राम हे यावर्षी मार्च महिन्यातच चंद्रपूर येथून बदली होऊन वडसा वनविभागात रुजू झाले होते.