नाशिक (वृत्तसंस्था) शिक्षण संस्थेवर कारवाई करण्यासाठी मुख्याध्यापकाकडून पन्नास हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी महपालिकेतील शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (57, रा. 801 रचित सनशाइन उंटवाडी नाशिक (वर्ग-२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात ताब्यात घेतले. शिक्षण विभागातीलच लिपिक नितीन जोशी (45, रा. फ्लॅट नंबर ८, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक (वर्ग -३) यानेही पाच हजार रूपयांची लाच मागितली असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदारने खासगी शैक्षणिक संस्थेत नाशिकमधील मुख्याध्यापकपदावर कार्यरत होते. मात्र, त्याना संस्थेने गैरवर्तनाचा ठपका ठेवत मुख्याध्यापक पदावरून बडतर्फ केले होते. या बडतर्फीविरोधात मुख्याध्यापक शैक्षणिक न्यायाधीकरणाकडे दाद मागितली होती. त्यानुसार त्यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यात आली होती. या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. परंतू त्यावर पत्र देण्यासाठी मुख्याधापकाकडे ५० हजारांची मागणी करण्यात आली. त्यानुसार मुख्याध्यापकाने एसीबीकडे तक्रार केली होती.
परंतू तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास धनगर यांच्या कार्यालयातच सापळा रचला. तक्रारदाराकडून धनगर यांनी ५० हजारांची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. तर त्याचवेळी धनगर यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नितीन जोशी याने हे पत्र बनवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेतल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक संदीप घुगे, निरीक्षक गायत्री जाधव यांच्यासह कर्मचारी एकनाथ बाविस्कर,प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी हा सापळा यशस्वी केला.
घर झडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या घरात 85 लाख रुपयांची रोकड सापडली. सोबतच 32 तोळे सोने मिळाले. धनगर यांच्या नावावर नाशिकमधील उच्चभ्रू वस्तीत दोन प्लॅट असल्याचे कळतेय. उंटवाडी परिसरात असलेल्या एका प्लॅटची किंमत दीड कोटी असल्याचे समजते. तसेच त्यांचा प्लॉटही असल्याचे समोर आले आहे. धनगर यांची बँक खाती, लॉकर्सचा तपास सुरू असून त्यातूनही मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.