कोल्हापूर (वृत्तसंस्था) दारू पिताना घराजवळील वृद्धेला दुसऱ्यांदा सापडल्यानंतर ती घरात सांगेल या भीतीने तरुणाने तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय ७०, रा. संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर, कोल्हापूर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सिव्हिल इंजिनिअर असलेल्या प्रतीक विनायक गुरुले (वय २२, रा. संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) नामक तरुणाला अटक केली.
नातीला गरबाच्या ठिकाणी सोडून जातांना घडलं भयंकर !
नातीला दांडिया खेळण्यास सोडून रात्री १० वाजता सुभाषनगर येथील घरी जाणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर जवाहरनगरातील चर्चच्या पाठीमागे रविवारी सकाळी वृद्धेचा मृतदेह मिळून आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण व राजारामपुरी पोलिसांच्या पथकाने अवघ्या चार तासांत संशयित आरोपीला अटक केली. प्रतीक विनायक गुरुले (वय २२, रा. रोहिदास कॉलनी) असे त्याचे नाव आहे. जवाहरनगरातील शाळेच्या पाठीमागे प्रतीक शिंदे हा शनिवारी रात्री दारू पीत बसला होता, हे तेथून जाणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर यांनी पाहिले. ‘तू इथे दारू पीत बसला आहेस, हे तुझ्या घरात जाऊन सांगतो,’ असे लक्ष्मीबाई म्हणाल्या गेल्या वेळी या आजीमुळेच आमच्या घरात भांडण झाले, त्याची पुनरावृत्ती होईल या भीतीपोटी प्रतीकने रागाच्या भरात लक्ष्मी यांना भिंतीवर ढकलून दिले आणि नंतर तेथे पडलेला दगड डोक्यात घालून खून केला. त्यानंतर संशयित तेथून पळून गेल्याचे तपासात उघड झाले होते.
प्रतीकचा झालाय सिव्हिल डिप्लोमा !
प्रतीकचा सिव्हिल डिप्लोमा झाला असून, नोकरी नसल्याने तो सध्या घरीच होता. क्षीरसागर कुटुंबीय २५ वर्षांपासून सुभाषनगरातील रोहिदास कॉलनीत राहण्यास आहेत. लक्ष्मी क्षीरसागर यांच्या पतीचे निधन झाले आहे. मुलगा गणेश, सून मनीषा, नातू विनीत आणि नात विधी असे पाच जणांचे कुटुंब होते. वृद्ध लक्ष्मी या घरीच चपला तयार करण्याचे काम करत होत्या, तर मुलगा गणेश हा प्लंबिंगचे काम करतो.
मुलाला सुरुवातीला आला वेगळाच संशय !
सुभाषनगरात महिला व मुली दांडिया खेळत होते. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नातीला दांडिया खेळण्यासाठी सोडायला लक्ष्मी क्षीरसागर या गेल्या होत्या. रात्रीचे १० वाजले तरी आई घरी आली नाही म्हणून काळजीत पडलेला मुलगा गणेश याने परिसरात शोधाशोध केली. आईच्या सर्व मैत्रिणींच्या घरी जाऊन चौकशी केली; मात्र त्या सापडल्या नाहीत. आईच्या अंगावर पाच ते सात तोळ्यांचे दागिने होते. त्यामुळे कोणी घातपात केला नाही ना, असा संशय त्याला येऊ लागला. अखेर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गणेशने राजारामपुरी पोलीस ठाण्यात आई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.
कचरा टाकण्यासाठी आल्यानंतर महिलांना दिसला मृतदेह !
जवाहरनगरातील चर्चमधील कल्पना सोनीकर आणि सुवर्णा पोळ या दोन महिला कचरा टाकण्यासाठी आल्यानंतर भिंतीलगत वृद्धा पडलेली दिसली. समोरच्या मैदानात खेळत असलेल्या मुलांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी लक्ष्मी क्षीरसागर यांचा हा मृतदेह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी दगड, वृद्धेचे चप्पल पडले होते. दरम्यान, प्रतीकसोबत मयत लक्ष्मी क्षीरसागर यांचा पूर्वी वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी प्रतीकला अटक केल्यानंतर त्याने घडलेला सर्व हकीगत पोलिसांना सांगितली.
अशी झाली गुन्ह्याची उकल !
शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास संशयित प्रतीक आणि लक्ष्मी क्षीरसागर यांना परिसरातील काही लोकांनी एकत्र पाहिले होते. यामुळे पोलिसांनी त्याचे मोबाइल लोकेशन तपासले असता, गुन्हा घडलेल्या वेळेत तो याच परिसरात होता असे स्पष्ट झाले. त्याला घरातून ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत कारणही सांगितले. दरम्यान, लक्ष्मी क्षीरसागर यांच्या मृतदेहावर सोन्याची माळ, हातातील पाटल्या, कानातील दागिने शाबूत होते. त्यामुळे लुटमारीच्या उद्देशाने खून झाला नसल्याचे आधीच स्पष्ट झाले होते.
बेरोजगार होता प्रतीक !
सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका घेतलेला प्रतीक बेरोजगार आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याने प्रेमविवाह केला. त्याचे वडील पाटबंधारे विभागात लिपिक आहेत, तर आई गृहिणी आहे. १५ दिवसांपूर्वी तो दारु पिताना लक्ष्मी क्षीरसागर यांना सापडला होता. त्यांनी हा प्रकार प्रतीकच्या घरात सांगितला. त्यावरून जोरदार वाद झाला होता. पुन्हा घरात वाद होईल, या भीतीने त्याने वृद्धेला भिंतीवर ढकलून आणि डोक्यात दगड घालून खून केला. याबाबतचे वृत्त आज विविध स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
















