पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील खाजोळा गावाजवळील सार्वे बुद्रुक येथे २७ वर्षांचा तरुण बुधवारी सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान गावाबाहेर शौचालयास गेला होता. मक्याच्या शेतात हिंस्र प्राण्याने या युवकावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोबाइल लोकेशनद्वारे रात्री १० वाजता पोलिसांना या युवकाचा मृतदेह आढळला.
सार्वे बुद्रुक येथील सुजित डिगंबर पाटील (वय २७) हा युवक २९ रोजी पहाटे ८.३० वाजता गावाजवळील मक्याच्या शेतात शौचालयास गेला होता. तर सुजित पाटील यांचे आजोबा हतनूर ( ता. कन्नड) येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. ते रात्री परत आल्यानंतर सुजित घरी नसल्याने त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. सुजितच्या मोबाइलची रिंग वाजत होती. परंतु, मोबाइल कुठे वाजतोय हे कळत नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी थेट नगरदेवळा दुरक्षेत्र गाठून पोलिसांना माहिती दिली.
पोलिस पथकाने सार्वे गावाच्या आजूबाजूला शोध घेतला. त्यावेळी गावाजवळील मक्याच्या शेतात सुजितचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मोबाइल व काही अंतरावर शौचालयाचे भांडे आढळून आले. सुजितच्या गळ्यावर, मानेवर व हातावर हिंस्त्र प्राण्याने लचके तोडल्याचा दीर्घ जखमा आढळल्या आहेत. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. परंतु येथे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले नाहीत. सुजितच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. मृत सुजित हा एकटाच मुलगा होता. दरम्यान, गत ८ दिवसांपूर्वी गावातील काही नागरिकांना एका बछड्यासह बिबट्या आढळला होता.