भडगाव (प्रतिनिधी) येथील शिवाजी नगरातील रहिवासी अनिल भास्कर पाटील (वय ३८, मूळ गाव, बाळद) २२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे २२ रोजीच त्यांच्या नवीन घराची वास्तुशांती होती.
अनिल पाटील हे कृषी कंपनीचे मार्केटिंग व्यावसायिक होते.
शेतकरी व ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. अत्यंत कष्टाने त्यांनी शिवाजीनगर भागामध्ये नवीन घर बांधले. त्या घराचा वास्तुशांती कार्यक्रम त्यांनी २२ रोजी आयोजित केला होता. यासाठी त्यांनी तयारी केली होती. शेकडो नागरिकांची भोजन व्यवस्था करून मंडप टाकण्यात आला होता. घरात नातेवाईकही आले होते. वास्तुशांतीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. अचानक २२ रोजी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्याविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी भडगाव येथे अंत्यसंस्कार केले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनिल पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.