नागपूर (वृत्तसंस्था) शहरातील बारापात्रे कुटुंबीय वाकी (ता. सावनेर) येथील ताजुद्दीन बाबांचे दर्शन घेतल्यानंतर दर्ग्याच्या मागे वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्राकडे फिरायला गेले. यावेळी डोहात पोहायला उतरलेला तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २८) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. दीपक सुरेश बारापात्रे (२९, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे.
नागपुरातील दिघोरीवरून बारापात्रे कुटुंब, त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी हे वाकी दर्गा येथे सहलीकरिता गेले होते. मृतकही सोबत होता. मृतक दीपकची पत्नी सारिका बारापात्रे, बहीण व पत्नीच्या काही मैत्रिणींसह अंघोळीकरिता पाण्यात उतरले. त्यात दीपकला खोल पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही. दीपक अधिक खोल पाण्यात अंघोळीसाठी गेला.
पावसाचे दिवस असल्याने आणि नदीपात्रातील गढूळ पाण्यामुळे पावसाचा अंदाज आला नाही. तो बुडायला लागला. दीपक पाण्यात बुडत असल्याचे दिसताच त्याला वाचविण्याकरिता पत्नी त्याच्याकडे धावली. पत्नी व तिच्या मैत्रिणीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले; परंतु दीपक काही हालचाल करीत नव्हता. घटनेची माहिती तत्काळ खापा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दीपकला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.