पिंप्री खु ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या बोरखेडा येथे रहिवासी असलेले निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. एकुलता एक व गावातील सुस्वभावी मुलाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पिंप्री खु ता. धरणगाव येथून जवळच असलेल्या बोरखेडा येथे रहिवासी असलेले निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील सेवानिवृत्त शिक्षक के पी पाटील यांचा एकुलता एक मुलगा शुभम कांतीलाल पाटील (वय २८) हा दिनांक ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेला होता. तो नेहमीच आपल्या शेतात पीक पाहणीसाठी फेरफटका मारायला जात असे. परंतु दुपारी चार वाजेपर्यंत मुलगा घरी न आल्याने घरच्या मंडळीनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी शुभम हा विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. शुभमला पाहून नातेवाईकानीं एकच टाहो फोडला. शुभमला उपचारसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
शुभम हा अत्यंत सु स्वाभाविक होता. स्वत हुन कोणाशीही बोलणे, शांत, समजूतदार मुलगा तसेच मोठा मित्रपरिवार असा त्याचा गोतावळा होता. त्याचे वडील हे नि.हा. चावलखेडा हायस्कूलला शिक्षक होते. काही दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. शुभम च्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झाले असल्याने तो नेहमी सोबत असायचा. परंतु आज त्याच्यावर काळाने घाला घातल्याने दुःख व्यक्त होत आहे. घटना माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली.