पंढरपूर (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी निघणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन हा आक्रोश मोर्चा निघणार असून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी मराठा समाजाला केले आहे.
पंढरपूर प्रशासनाने केलेलं आवाहन धुडकावत मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज बांधव ते पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी काढू नये, यासाठी काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे आज पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर मराठा समाज बांधव ठाम आहेत. पंढरपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यातच मराठा समाजाने आक्रोश मोर्चा पुकारल्याने पोलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय, ड्रोन द्वारे पोलिसांची आंदोलनस्थळी नजर असणार आहे. त्याशिवाय, मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज धडकणार आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्स आदिची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकर्त्यांच्या वतीने मातोश्रीवर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे













