जळगाव (प्रतिनिधी) घरात काम करणाऱ्या मोलकरणीने सोन्या बिस्कीटांसह २० लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीची चौकशी केल्यानंतर संशयित छाया संग्राम विसपुते यांना एलसीबीच्या पथकाने रविवारी सायंकाळी अटक केली. दरम्यान, या मोलकरणीने चोरी केल्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशातून फ्लॅटसह दोन दुचाकी खरेदी केल्याचे देखील उघड झाले आहे.
शहरातील विवेकानंदनगरात डॉ. प्रकाश चित्ते यांचे हॉस्पिटल असून ते तेथेच आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील राहत्या घरात छायाबाई संग्राम विसपुते ही मोलकरीन असून तीने मे ते डिसेंबर अखेरच्या काळा पर्यंत वेळोवेळी घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट चोरुन नेले होते. याप्रकरणी डॉ. चित्ते यांनी जिल्हापेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयित मोलकरीन छाया विसपुते हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत होते. त्यांनी शनिवारी महिलेला ताब्यात घेवून तीची चौकशी केली. यावेळी त्या महिलेने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास संशयित छायाबाई विसपुते हीला अटक करण्यात आली आहे.
आठ महिन्यांपासून करीत होती हातसफाई
डॉक्टर चित्ते यांच्या कडे कामावर असलेल्या मोलकरणीला डॉक्टर दिवसभर रुग्णालयातून येणारे पैसे कुठे ठेवतात, याबाबतची संपुर्ण माहिती होती. त्यामुळे ही मोलकरीण दोघे पती-पत्नी रुग्णालयात असतांना घरातील कपाटातून ठरावीक रक्कम काढून घेत होती. आठ महिन्यात या मोलकरणीने जवळपास २० लाख रुपयांची रोकडसह ५२ ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट चोरुन नेल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.