मुंबई (वृत्तसंस्था) मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. आमची तशी संस्कृती नाही. माझ्या वाक्यामध्ये सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द नाहीत. मी आमच्यावर टीका करणाऱ्यांना तो शब्द वापरला आहे. तरीदेखील कोणत्या महिलेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी सॉरी म्हणतो, अशा शब्दात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या थरात टीका केली. सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना त्यांनी भिकार… असा शब्द वापरला. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर चाल करत जोरदार निदर्शने केली. तर दुसरीकडे मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. आमच्यामध्ये भांडण लावू नका. मी कोणत्याही महिलेला बोललो नाही. कोणत्याही महिलेचे मन दुखले असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. पण जर आमच्याबद्दल कोणी कुणीतरी खोके नावाचा आरोप लावत असेल त्यांच्याबद्दल मी जे काही बोललो ती आमच्याकडील ग्रामीण भाषा आहे. महिलांच्या बद्दल मी एक शब्दही बोललो नाही,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.