जळगाव (प्रतिनिधी) आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्यावतीने आय.एम.आर महाविद्यालय, रायसोनी महाविद्यालय, एस.एस.बी.टी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना व त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
देशभरात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील कोविड-१९ व म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे ताळेबंदी ही सातत्याने केली जात आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन व आर्थिक स्थिती विस्कळीत झालेली आहे याचा परिणाम पालकांच्या रोजगार व उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जाणारे भरमसाठ शैक्षणिक शुल्क पालकवर्ग शाळा व महाविद्यालयांना देण्यास सक्षम नाही. कोविडमुळे सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असल्याने अनेक तांत्रिक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत.
शाळा व सर्व अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे भरमसाठ असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे व ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाहीये अशा सुविधांचे शुल्क शैक्षणिक शुल्कामध्ये आकारले जाऊ नये. उदा. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, जिमखाना, प्रयोगशाळा, इंटरनेट, महाविद्यालय विकास निधी, पार्किंग, ग्रंथालय शुल्क, इत्यादी.
आय.एम.आर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयीन शुल्कात कपात करून महाविद्यालय चालवायचे कसे असा प्रश्न विचारत कुठलीही कपात करणे शक्य नाही, असे देखील यावेळी सांगितले. व निवेदन देखील स्वीकार करण्यास तयार नव्हते, परंतु विद्यार्थ्यांच्या आक्रोश पाहून निवेदन स्वीकारले व कुठलाही विद्यार्थी महाविद्यालयीन शुल्कामुळे परीक्षेपासून वंचित राहता कामा नाही असे अभाविप महानगर मंत्री आदेश पाटील यांनी महाविद्यालयास सांगितले.
सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होत असताना शुल्क हे ऑफलाईन परीक्षा पद्धती प्रमाणेच आकारले जात आहे. त्याच बरोबरीने शुल्कात प्रोजेक्ट शुल्क ही मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. त्यामुळे परीक्षा शुल्कात देखील कपात करण्यात यावी, अशी देखील मागणी केली व रायसोनी महाविद्यालयाच्या वतीने परीक्षा शुल्कात ५०% शुल्क माफ केल्याचे देखील महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले व अभाविपच्यावतीने या निर्णयाचे स्वागत देखील केले.
कोविडमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या परिवारातील सदस्य कोविड मुळे दगावले असतील. अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा तसेच सर्व विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून या अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावे. अशा विविध मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्यावतीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व मुख्यमंत्री यांना निवेदनामार्फत करण्यात आले.
यावेळी अभाविपचे जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, नगरमंत्री आदित्य नायर, संकेत सोनवणे, अभिषेक खोपुल, दीपक बाविस्कर, यश चौधरी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.