नागपूर (वृत्तसंस्था) दोन्ही हात व खांदा फॅक्चर झाल्यामुळे महादुला येथील गावठी उपचार करणाऱ्या वृद्धाने लेप लावण्याच्या बहाणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची घटना रामटेक हद्दीत घडली.
दोन्ही हात व खांदा फॅक्चर झाल्याने सुरु गावठी उपचार !
पीडित मुलगी परिवारासह राहत असताना मार्च २०१८ मध्ये वीजखांब अंगावर पडल्यामुळे तिचे दोन्ही हात व खांदा फॅक्चर झाल्यामुळे शिक्षण बंद होते. यादरम्यान तिच्यावर स्थानिक दवाखान्यामध्ये उपचार सुरू होते. आराम होत नसल्यामुळे पीडितेच्या आईला गावठी औषध देण्याकरिता महादुला येथील संशयित आरोपी मनोहर सखाराम काठोके (६३, रा. महादुला, ता. रामटेक) याने सांगितले. मनोहर काठोके हा डिसेंबर २०१९ पासून रोज सकाळी पीडितेच्या घरी येऊन तिला लेप लावल्यावर दुपारी २ वाजता निघून जात होता. पीडितेला आराम पडत असल्याने तिच्यावर उपचार सुरू होता. जानेवारी २०२२ मध्ये पीडितेचे आईवडील सकाळी कामाला तर भाऊबहीण शाळेत गेले होते. यादरम्यान मनोहर काठोके लेप लावण्याकरिता घरी आला आणि त्याने पीडितेला लेप लावला.
पीडितेने दिला मुलीला जन्म !
माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत तिच्यावर अत्याचार केला. तिचे दोन्ही हात फॅक्चर व हाताला लेप असल्याने ती विरोध करू शकली नाही. कोणाला सांगितले जिवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत त्याने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने भीतीमुळे कोणाला काही सांगितले नाही. ९ ऑगस्ट रोजी पोटात दुखत असल्याचे तिने मनोहर काठोके याला सांगितले. त्याने पीडितेला उपचाराकरिता रामटेक येथील दवाखान्यात नेले असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने पीडितेला दुसऱ्या दिवशी रामटेक येथील एका हॉस्पिटलमध्ये नेले. ११ ऑगस्टला पीडितेने एका मुलीला जन्म दिला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (ठ), ५०६ भादंवि बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, ५ (एल), ५ (जे) (२), ६, ८, १२ कायद्यान्वये गुन्हा नोंद करून अटक केली. पुढील तपास सपोनि. स्वाती यावले करीत आहेत.