अमरावती (वृत्तसंस्था) अवघ्या आठ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी ५० वर्षीय नराधम नातेवाइकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित आठ वर्षीय चिमुकलीचा पिता व आरोपी हे नातेवाईक आहेत. १६ जून रोजी सकाळी आरोपीसोबत मुलीचा पिता काम पाहण्यासाठी बाहेर गेला होता. दुपारी ते सोबत घरी आले. त्यानंतर नेहमी प्रमाणे मटणाच्या दुकानावर बसायला पिता निघून गेला, तर त्याची आई घराबाहेर झोपलेली होती.
पिडीतेचा पिता हा बाहेरून परतला तेव्हा त्याला आतल्या खोलीतून भेदरलेल्या मुलीचा आवाज ऐकू आला. घरात गेला तेव्हा पिडीतेवर शारीरिक अत्याचार करत असल्याचे आढळून आले. संतप्त पित्याने लाथेने दार ढकलले आणि आरोपीला शर्ट ओढून बाहेर काढले. यादरम्यान घरमालकाने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सुचविले. ही संधी साधून आरोपीने पलायन केले. आरोपीने यापूर्वीही अश्लील कृत्य केल्याचे चिमुकलीने सांगितले. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार व पॉक्सो अन्वये गुन्हा नोंदविला.