धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा रोडवरील शगुन जिनिंगजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात भावडू उर्फ आशिष गजानन भावसार (वय ३२) हा पारोळा नाका परिसरात वास्तव्यास आहे. आशिष हा ग्रामीण भागात किरकोळ धान्य विक्रीचा व्यवसाय करत होता. नेहमी प्रमाणे आज तो खेडे गावावर जात असतांना सकाळी ८.३० वाजता त्याची पॅजो रिक्षा (एमएच १५ ईजी ६३०५ ) ही चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळील शगुन जिनिंग जवळ अचानक बंद पडली. याचवेळी वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने तिला जोरदार धडक दिली. यात अशिषच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. आशिषला जळगाव येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. शेवटचे वृत्त हाती आली तोपर्यंत धरणगाव पोलिसात अपघाताची नोंद नव्हती. दरम्यान, आशिषवर सायंकाळी साडेचार वाजता अंतिमसंस्कार होणार आहेत.
चार बहिणींचा एकुलता एक भाऊ
आशिषचे पितृछत्र बालपणीच हरवलेले होते. एवढेच नव्हे तर तो चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. आशिष मितभाषी आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायचा. तसेच प्रचंड कष्टाळू होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.
















