ठाणे (वृत्तसंस्था) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून या अकाऊंटद्वारे अश्लील आणि शिविगाळ असलेला मजकूर तसेच आव्हाड यांचे कौटुंबिक आणि वैयक्तिक फोटो फेसबुकवर प्रसारित केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने औरंगाबादच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या तरुणाचे नाव सुनिल राजे पवार (२८) असे या आरोपीचे नाव आहे. मूळचा औरंगाबादमधील वैजापूरचा असलेला सुनील सध्या एमएससी करत आहे. तसेच वाळूंज एमआयडीसीमध्ये कामाला देखील आहे. सुनिल हा उच्च शिक्षित तरुण आहे. त्याने एमएससीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. औरंगाबाद मधील वैजापूर येथे सुनिल राहत असून वाळूंज एमआयडीसी येथे तो कामाला देखील आहे. सुनीलने मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बनावट फेसबुक अकाऊंट का बनवले? कोणाच्या सांगण्यावरून बनवले? त्या मागे त्याचा काय उद्देश होता? हे अजून स्पष्ट झालं नाही. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना मारहाण झाली होती. या प्रकरणानंतर आव्हाड यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले होते, असे ठाणे सायबर सेलमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट फेसबुक अकाऊंटच्या डीपीवर आव्हाड यांच्या कुटुंबाचा फोटो ठेवण्यात आला होता. या अकाउंटद्वारे अश्लील आणि शिविगाळ असलेला मजकूर तसेच आव्हाड यांचे कौटुंबिक, वैयक्तीक फोटो प्रसारित करण्यात आले होते. ठाणे सायबर सेलने तंत्रज्ञांच्या मदतीने तपास करत सुनील पवार याला औरंगाबादमधून ताब्यात घेतले व चौकशीनंतर अटकेची कारवाई केली. सुनील राजे पवार हे त्याचे टोपण नाव असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला आता न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.