पुणे (वृत्तसंस्था) आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्यावतीनं अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली.
आंबिल लोढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे पोलिसांसह पालिका अधिकारी पोहोचले होते. मात्र यावेळी स्थानिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केलं. यावेळी ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या. काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे.
पोलीस अचानक आले आणि आम्हाला घर खाली करण्यास सांगत आहेत. आम्हाला या कारवाईसंबंधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. आमचं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आम्ही येथे ५० ते ६० वर्षांपासून राहत असून आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करा अशी नागरिकांची मागणी आहे. तसंच पालिका नाही तर खासगी बिल्डरच्या नोटीशीनंतर कारवाई सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नोटीशीवर पुणे मनपाचा शिक्का का नाही? अशी विचारणा स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
















