जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दोन जणांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश चंद्रकांत कंजर (३४, रा. खंडेराव नगर) व सोनू रामेश्वर पांडे ( २८, मामाजी टाकी मागे, भुसावळ) या दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
खंडेराव नगरातील प्रकाश कंजर हा अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करीत होता. त्याच्यावर एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. तर सोनू पांडे याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, शिवीगाळ करून धमकी देणे असे सहा गुन्हे होते. या दोघांच्या एमपीडीएच्या कारवाईचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दोघांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश काढले.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आपल्या आदेशात म्हटलेय की, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबतचा अधिनियम सन 1981 (महाराष्ट्राचा कायदा क्रमांक 55 सन 1981) (सुधारणा) अधिनियम, 2015 अर्थात एमपीडीए कायद्यांतर्गत समाजासाठी धोकादायक असलेले प्रकाश चंद्रकांत कंजर (३४, रा. खंडेराव नगर) व सोनू रामेश्वर पांडे ( २८, मामाजी टाकी मागे, भुसावळ) या दोघांविरुद्ध दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सन 2020 पासून जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात अवैधरित्या हातभट्टीची दारु तयार करुन त्याची विक्री करीत असून त्याचेवर एकूण दाखल 08 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या प्रकाश कंजर यांच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक जळगाव यांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी मंजूरी दिल्याने सदर स्थानबध्दास एक वर्षासाठी ठाणे जि. ठाणे येथील मध्यवर्ती कारागृह येथे एमपीडीए कायद्यांतर्गत “हातभट्टीवाले” या सदराखाली स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे.
सन 2013 पासून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात साथीदारांसह घरफोडी करणे, जबरी चोरी करणे, दुखापतीसह जबरी चोरी करणे, हत्यारासह गंभीर दुखापत करणे, आर्म अॅक्ट, अनाधिकृतपणे गृहप्रवेश करुन मारहाण, शिवीगाळ करुन धमकी देणे अशा विविध प्रकारचे एकूण 06 गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला असल्याने सोनू पांडे याच्यावर देखील एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक जळगाव यांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी मंजूरी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर सदर व्यक्तीस एक वर्षासाठी येरवडा जि. पुणे येथील मध्यवर्ती कारागृह येथे धोकादायक व्यक्ती या सदराखाली स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे. सोनू पांडेबाबतचा प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांनी सादर केला तर प्रकाश कंजरचा प्रस्ताव रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील व सहकार्यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
एमपीडीए कायद्यांतर्गत माहे नोव्हेंबर 2022 पासून आजपावेतो गंभीर गुन्हे दाखल असलेले एकूण 21 गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे. नाशिक, येरवडा या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याबाबतची कारवाई जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशान्वये करण्यात आलेली आहे.
















