अहमदपूर (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यातील सर्व जनतेसाठी अस्मितेचे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे कार्य हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. मालवण राजकोट किल्ल्यावरील त्यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, हे दुर्दैवी असून, संबंधितावर कारवाई तर होणारच आहे, पण भविष्यात अशी चूक होणार नाही, झालेल्या घटनेबद्दल राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदपूर येथील जनसन्मान यात्रेत सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा वाऱ्यामुळे पडला. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी दैवत आहेत. वर्षाच्या आतमध्येच अशाप्रकारे पुतळा कोसळणे ही सर्वांसाठीच धक्कादायक बाब आहे यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे, तसेच यामध्ये वरिष्ठ अधिकारी असो की कंत्राटदार, कारवाई तर होणारच. कंत्राटदार तर काळ्या यादीमध्येच टाकला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. या वेळी खा. सुनील तटकरे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विक्रम काळे यांची उपस्थिती होती.
सुरक्षेबाबत महिलेचा भर सभेत प्रश्न !
अहमदपूर येथील जनसन्मान यात्रेत उमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधून संबोधितही केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचे ते सांगत असतानाच एक महिला उभी राहिली आणि म्हणाली, दादा तुम्हाला विनंती आहे. महिलांची सुरक्षा हीच महत्त्वाची आहे. यावर अजित पवार यांनी महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत. दोषी कोणीही असो, त्याची सुटका नाही, असेही त्यांनी सांगितले.