नाशिक (वृत्तसंस्था) जळगाव जिल्ह्यातून आलेल्या 1 हजारावर कार्यकर्त्यांची नाशिक रोडवरील मित्रा या शासकीय प्रशिक्षण संस्थेत निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवारी सकाळी या संस्थेच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला आल्यामुळे मुंबईच्या मेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची नाशकात ओली पार्टी केल्याची चर्चा रंगली आहे.
शेवभाजीसह चार भाज्या आणि गुलाबजाम असा होता जेवणाचा बेत !
जळगाव जिल्ह्यातील 82 क्रुझर,खासगी बसने कार्यकर्ते मंगळवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास मित्रा या संस्थेच्या विश्रामगृहात पोहोचले. शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना या संस्थेत प्रशिक्षण देण्यात येते. वातानुकूलित विश्रामगृह आहे. तेथे शिंदे गटाचे कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. शेवभाजीसह चार भाज्या, गुलाबजाम असा जेवणाचा बेत होता. परंतू विश्रामगृहात रात्री कार्यकर्त्यांची मधुशालाच रंगली.
मुक्कामाच्या ठिकाणी बाजूलाच होता वाईन शॉप !
मुक्कामाच्या ठिकाणी बाजूलाच वाईन शॉप होते. त्यामुळे सकाळी विश्रामगृह आवारात रिकाम्या दारूच्या व पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. सकाळी शिंदे गटातर्फे कार्यकर्त्यांना नाश्त्यात वडापाव देण्यात आला. अन्नपूर्णा भोजनगृहात पोहे, शिरा व चहा असा नाश्ता देण्यात आला. तर विश्राम गृहातील व्यवस्था बघून कार्यकर्ते आमदार शहाजी पाटील यांचा काय झाडी,काय डोंगार,काय हाटील हा फेमस डायलॉग म्हणत होते, असे देखील कळते.
जळगाव पासूनच पेगवर पेग रीचवणे झाले सुरू !
खासगी बस जळगाव वरून रवाना झाल्यापासून कार्यकर्त्यांचे पेगवर पेग रीचवणे सुरू झाले. वाहनांमध्ये दारूची व्यवस्था होती. रसद संपल्या नंतर अमळनेर,धुळे येथील बारजवळ वाहनांनी थांबा घेतला. मजल दर मजल करीत वाहने नाशिकला पोहोचली, असे कळते. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने ऑनलाईन प्रकाशित केले आहे.