मुंबई (वृत्तसंस्था) ड्रग्ज पेडलरकडे एमडीची मागणी आणि खरेदी केल्या प्रकरणात अभिनेता दलिप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने अटक केली आहे.
ध्रुव ताहील एका ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होता. तो पेडलरकडून वारंवार ड्रग्जची मागणी करत होता. ड्रग्जसाठी ध्रुवने त्याला पैसे दिल्याचंही उघड झालं आहे. दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ध्रुव ताहील याला अटक केली. एनडीपीएस कायद्याअंतर्गत ध्रुवला अटक झाली असून त्याला वांद्रे क्राईम ब्रांचमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्याला कोर्टात हजर केले जाईल.
३५ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलकडून २० एप्रिलला मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक करण्यात आली होती. त्याचा मोबाईल अंमली पदार्थ विरोधी विभागाने ताब्यात घेतला. तेव्हा त्याच्या व्हॉट्सअॅपवर ध्रुव ताहील याच्यासोबतचे संभाषण समोर आले. ध्रुव मुजमिलकडे वारंवार ड्रग्जची मागणी करत होता.
ध्रुवने ड्रग्जसाठी आरोपी मुजमिलच्या बँक खात्यात सहा वेळा ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले होते, असं तपासात स्पष्ट झालं. मार्च २०१९ पासून दोघं संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक करण्यात आली असून एमडी विकत घेऊन ध्रुव स्वतः त्याची नशा करायचा की अजून कोणाला विकायचा याचा पोलीस आता शोध घेत आहेत.