मुंबई (वृत्तसंस्था) जोग एज्युकेशनच्या अकरा शाळांसाठी (schools) शिक्षण अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या करून स्व मान्यता प्रमाणपत्र तयार करून कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोग (pushkar jog) यांच्या माताेश्री जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग (surekha jog) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या 11 शाळांची खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून शाळांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी जोग एज्युकेशन ट्रस्टने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर केली आहेत. तसेच या अकरा शाळांच्या मुख्याध्यापकाद्वारे 25% मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांना सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षण विभागातील अधिकारी किसन दतोबा भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग तसेच गौतम शंकर शडगे, किशोर पवार, हेमंत सावळकर यांच्या विरोधात भादवी 420, 464, 465, 466, 468, 470, 471,201, आणि 120 ब 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींना सध्या अटक करण्यात आली नसून बंडगार्डन पोलिस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.