मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यास मदतीचा हात देणाऱ्या सोनू सूदने काही दिवसांपूर्वीच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. याची माहिती त्याच्या चाहत्यांना मिळताच अनेकांनी सोनूच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. पण, आता सोनूच्या चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण कोरोनाच्या संसर्गातून तो मुक्त झाला आहे.
सोनू एका आठवड्यातच कोरोना निगेटिव्ह झाला आहे. १७ एप्रिलला सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह झाला होता, त्यानंतर त्याची २३ एप्रिलला कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी सोनूने १० दिवस आधी लस टोचून घेतली होती. कोरोना झाल्यानंतर अभिनेता बर्याच दिवसांपासून घरीच स्वत:ची काळजी घेत होता. तर, यादरम्यान देखील सोनू सोशल मीडियावर खूप अॅक्टिव होता, तिथे तो सतत लोकांना मदत करत होता.
आपण कोरोनाशी लढाई कशी लढावी, हे सोनूने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. सोनू म्हणतो की, आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल तर औषधांसह आपल्याला स्वतःला सकारात्मक ठेवावे लागेल आणि अशा प्रकारे आपण लवकरच बरे होऊ शकता. तो म्हणाला होता की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर, तुमची काळजी घ्या कारण कोणीही इतर तुमची काळजी घेणार नाही आणि ही कोरोनाची सर्वात भयानक गोष्ट आहे.’