मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. याचा प्रभाव सोनूच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील पडला आहे. परिणामी त्याने आपल्या पुढील चित्रपटांमध्ये खलनायकांच्या भूमिका साकारण्यास नकार दिला आहे.
त्याला बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकांचेच रोल साकारण्याची विनंती केली जात होती. मात्र या सर्व चित्रपटांना त्याने नकार दिला आहे. अभिनेता सोनू सूदने आजपर्यंत अनेक गरिबांना मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मजुरांना घरी सोडण्यापासून ते त्यांच्या अन्नाची सोय करण्यापर्यंत सगळं काही सोनू सूदने केलं आहे. लॉकडाउनच्या काळात अभिनेता सोनू सूदनं अनके गरजवंतांची भेट घेतली. सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचा त्याने फार जवळून अनुभव घेतला. या अनुभवामुळे लोकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींबाबत त्याच्या मनात घृणा निर्माण झाली आहे. परिणामी यापुढे केवळ नायकांच्याच भूमिका साकारण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.