मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे. केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढल्या आहेत. ठाणे न्यायालयाने केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलीस आता केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओकवरील हल्ल्यानंतर विविध गुन्ह्यांप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर महाराष्ट्रवारी करण्याची वेळ आली. आता तीच परिस्थिती केतकी चितळेवर ओढवण्याची शक्यता आहे. पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळेलाही विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यांप्रकरणी राज्याचा दौरा करावा लागण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात जवळपास 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
मी पोस्ट डिलीट करणार नाही, केतकीचा युक्तीवाद
केतकीनं कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं होतं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला होता. केतकीनं सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की, मी या पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं होतं.