छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन चार मित्र आपल्या गावी स्विफ्ट डिझायर कारने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात असताना दाभरुळ (ता. पैठण) शिवारातील एका पुलावरून स्विफ्ट डिझायर कार खाली एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. १२) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये दीपक शामराव नवले (३२) रा. पाल्ली (ता. जि.बीड) हा तरुण जागीच ठार झाला तर करण रामभाऊ घाडगे (२६), सचिन अमृतराव मुसळे (२४), प्रसाद खाडकेकर (२८) हे गंभीर जखमी झाले आहे.
बीड जिल्ह्यातील चार तरुण शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी आपल्या स्विफ्ट कार (क्र. एमएच २० इइ ६१९१ ) ने आले होते. दरम्यान, शनिवारी दीपक शामराव नवले, करण रामभाऊ घाडगे, सचिन अमृतराव मुसळे, प्रसाद खाडकेकर हे चौघे मित्र सायंकाळी दर्शन घेऊन घराकडे परतत असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ शिवारातील पुलावर चालकाचे मृत गाडीवरून नियंत्रण सुटून कार पुलावरून खाली असलेल्या एका झाडाला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे अक्षरशः चुराडा झाला होता. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रशांत नांदवे, पोलीस कर्मचारी करीत आहेत.