पुसद (यवतमाळ) येथून नवस फेडण्यासाठी दिग्रस तालुक्यातील रुई तलाव येथे जात असलेल्या कुटुंबासह नातेवाईकांवर काळाने घाला घातला, दिग्रसकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटीला साइड देण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहन पुलावरून खाली जंगलात कोसळले. या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. ही घटना पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण फाट्याजवळ लोकनायक बापुजी अणे स्मृती स्थळानजीक मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली, या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
ज्योती नागा चव्हाण (५०) रा. बूंदी,वसराम देवसिंग चव्हाण (६२) रा. सिंगरवाडी (धानोरा), पार्वती रमेश जाधव (५२) रा. वसंतपूर, उषा विष्णू राठोड (५०) रा. बूंदी या चौघांचा जागीच तर रुग्णालयात उपचारादरम्यान निलाबाई क्सराम चव्हाण (६०) रा. सिंगरवाडी (धानोरा), सावित्री गणेश राठोड (४०) रा. जवाहरनगर तांडा धुंदी या दोन महिलांचा मृत्यू झाला, या सहा मृतकांमध्ये बसराम व निल्लाचाई है पती-पत्नी होते तर त्यांची आठ वर्षीय नात पूजा सागर चव्हाण ही अतिगंभीर असून, ती खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. वसराम व निलाचाई यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा आप्त परिवार आहे.
आदित्य संतोष पवार (०९), दर्शन संतोष पवार (५), सोमनाथ गणेश राठोड (३०), अनिता सोमनाथ राठोड (२४), निर्मला गणेश राठोड (४५) रा. जवाहरनगर, पूजा सागर चव्हाण (८), सावित्री राठोड (४०), गणेश राठोड (६२) रा. जवाहरनगर तांडा, आशाबाई चव्हाण (४२) हे स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर प्रथमेश अर्जुन राठोड (३) रा. पांढुर्णा (पारवा), राज राहुल चव्हाण (५) रा. मोहास्थित टोकी तांडा हे अतिगंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले. अपघातग्रस्तांमध्ये निर्मलाबाई, सोमनाथ व आशाबाई चव्हाण रा. सेवानगर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या चालक ज्ञानेश्वर राठोड यास आपली आई सावित्रीबाईचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे कळताच त्याने भिंतीवर डोके आदळत स्वतःवरील रोष व्यक्त केला. अतिगंभीर असलेल्या निर्मलाबाई, सोमनाथ व आशाबाई यांच्यावर उपचाराचे विशेष प्रयत्न सुरू असून, गरज भासल्यास त्यांना इतरत्र हलवावे लागणार आहे.
दिग्रस तालुक्यातील रुई तलाव हे बंजारा समाजाचे प्रख्यात संत सेवालाल महाराजांचे देहावसान झालेले ठिकाण आहे. येथे देशातील बंजारा समाजबांधवांची आस्था जुळलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील बंजारा समाज हा पोहरादेवी व रुई तलाव येथे इच्छा पूर्तीसाठी बोललेला नवस फेडण्यासाठी जातात. अशाच एका इच्छेपूर्तीसाठी बोललेला नवस फेडण्यासाठी गणेश राठोड रा. जवाहरनगर हे आपल्या मालकीच्या एमएच २९-३१७२ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाद्वारे नातेवाईकांसह रुई तलाव येथे निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दोन पलट्या घेऊन पुलावरून खाली जंगलात कोसळले. वाहन गणेशाचा मुलगा ज्ञानेश्वर गणेश राठोड (२४) हा चालवित होता. चालक ज्ञानेश्वरविरोधात ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला असल्याची माहिती ठाणेदार राजेश राठोड यांनी दिली.
एक नव्हे तर चार नातेवाईकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बघून स्वतःला दोष देत चालक ज्ञानेश्वरने नवसाचा बोकुड बांधलेल्या दोरखंडाने घटनास्थळी झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अपघाताचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी जमलेल्या जमावाने त्यास रोखल्याने चालकाचा जीव बचावला. दोन्ही आमदारांची रुग्णालयात धाव घटनास्थळी व रुग्णालयात स्थानिक आ. अॅड. इंद्रनील नाईक, आ. अॅड. निलय नाईक यांनी भेट देऊन रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सहाही मृतकांच्या नातेवाईकाना लवकरात लवकर भरीव आर्थिक साहाय्य मिळवून देणार असल्याचे आ. अॅड. इंद्रनील नाईक यांनी दै. ‘पुण्य नगरी’ला सांगितले. अपघातग्रस्तांना दोन्ही आमदारांनी आर्थिक मदत देखील केली.
















