दौलताबाद (वृत्तसंस्था) धुळे-सोलापूर महामार्गावर फतियाबाद गावाजवळ मारुती स्विफ्ट डिझायर कारने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने तीन जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवार, ६ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडला. अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढील भाग पूर्णपणे तुटून मागे गेला. मृतकांमध्ये राजू आसाराम उचित (६०), अलकाबाई राजू उचित (५५), अर्जुन राजू उचित (२५, रा. लायननगर, वाळुज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
राजू उचित हे कुटुंबासोबत पत्नी अलकाबाई, मुलगा अर्जुन, मुलगी व जावई यांना घेऊन कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे बाळूमामा यांच्या मेंढ्यांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन करून मारुती स्विफ्ट डिझायर कारने घरी वाळुजकडे परतत असताना फतियाबाद गावाजवळ वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात राजू उचित, पत्नी अलकाबाई, मुलगा अर्जुन व मुलगी, जावई गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी राजू उचित, अलकाबाई उचित व अर्जुन उचित यांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी असलेल्या मुलगी व जावई यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातातील मयत राजू उचित हे वाळुज बु. येथे शेती करत होते, तर मुलगा अर्जुन वाळुज गावातील लायननगर भागात किराणा दुकान चालवत होता. तीन महिन्यांपूर्वीच अर्जुनचे लग्न झाले होते. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वाळूज परिसरात शोककळा पसरली आहे.















