जळगाव (सुरेश उज्जैनवाल) राजकारणी अथवा जनमान्य नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अभिष्टचिंतनाच्या जाहिराती ही काही नवीन बाब नाही, किंबहुना अश्या जाहिराती हा एक ट्रेडच बनला आहे. विशेषत: विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यामध्ये तर अश्या जाहिराती प्रसिद्धीची स्पर्धाच लागलेली असते. त्यामागे त्यांचे काय हेतू असतात? ते जाहिराती करणाऱ्यांनाच ठाउक,पण त्या निरर्थक नसतात एवढं मात्र निश्चित… !
स्थानिक दैनिकात १२ डिसेंबर मंगळवार रोजी प्रसिद्ध झालेल्या पानभर जाहिरातीने जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष्यवधले गेले. राष्ट्रवादीचे नेते देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांनी शुभेच्छा देणारी जाहिरात दिली. शरद पवार हे राजकीय, सामाजिकदृष्ट्या सर्व श्रेष्ठ लोक नायक आहेत, संजय पवार यांची प्रचंड निष्ठा आणि श्रद्धा शरद पवारांवर आहे. त्या भावनेतूनच त्यांनी ही शुभेच्छा जाहिरात दिली. तर त्याच जाहिरातीत दिवंगत पद्मश्री भवरलालजी जैन अर्थात मोठे भाऊ यांना ही त्यांचा १२ डिसेंबर वाढदिवस म्हणून आवर्जुन विनम्र अभिवादन करीत आठवण केली आहे. श्री मोठे भाऊ यांनी समस्त शेतकरी समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या परिणामकारक योगदानाबद्दल कृतज्ञता हा भाव त्या मागे आहे. तर शरद पवार आणि मोठे भाऊ श्री भवरलाल जी जैन यांचा जन्म दिवस एकाच तारखेस असणे हा देखिल एक योगायोग आहे. म्हणूनच संजय पवार यांनी दिलेली जाहिरात लक्षवेधी ठरते.
राजकीय अंगाने विचार केल्यास विद्यमान परिस्थितीत संजय पवार हे राष्ट्रवादी गटांतर्गत फुट पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सक्रिय आहेत. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे ते जिल्हाध्यक्ष ही आहेत.अशी वस्तुस्थिती असताना शरद पवारांचं अभिष्टचिंतनपर जाहिरात संकुचित विचारसरणीच्या राजकारण्यांसाठी लक्षवेधणारी आणि संजय पवार यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पण व्यापक विचारसरणीने याकडे पाहिल्यास एक वेगळा संदेश यात दिसून येतो, तो असा की, राजकीय भूमिकेच्या अंगाने मत भिन्नता असावी, मनभेद अथवा शत्रुत्व नसावे.
अलीकडचे राजकारण कमालीचे बिघडले आहे. राजकीय वर्तुळात भलताच गोंधळ दिसून येत आहे. काही वेळा सत्ताधारी पक्षातील लोक विरोधी पक्षात असल्या सारखे वागतात, नक्की कोण कोणासाठी काम करत आहे.याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे. नेत्याप्रती निष्ठेच्या देखाव्याची स्पर्धाही जोरात आहे. अश्या या काळात राजकारणा पलीकडचा विचार दुर्मिळ होत असताना संजय पवार यांची जाहिरात राजकारण आणि सामाजिक भावबंधमधील फरक दाखविणारी ठरते. तसे पाहिल्यास शरद पवार आणि संजय पवार कुटुंबाचा संबंध पाच दशकांचा आहे. माजी आमदार स्व मुरलीधरअण्णा पवार यांचे घनिष्ठ संबंध कायम होते. ती परंपरा संजीव पवार पुढे नेत आहेत. राजकारणापेक्षा सामाजिक भावबंध महत्वाचा आहे, हेच या जाहिरातीतून स्पस्ट होते. आणखी या जाहिरातीचे वैशिष्ठ असे की, एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता वेगवेळ्या पक्ष, गट तटातील लोकांची छायाचित्रे झळकली आहेत.
-सुरेश उज्जैनवाल
(ज्येष्ठ पत्रकार जळगाव तथा प्रदेश उपाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया)