छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) तब्बल १५ वर्षानंतर पहिल्यांदाच पगार झालेल्या शिक्षकाचा मुलासोबत त्याच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. या अपघातात शिक्षक संजय सुखदेव दहिफळे (वय 43) आणि त्यांचा मुलगा समर्थ दहिफळे (वय 10 वर्ष, दोन्ही राहणारे पिंपळवाडी, ता.पैठण) जागीच मृत्यू झाला आहे. तर संजय यांच्या पत्नी वर्षा दहिफळे या देखील अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
नेमकं काय घडलं !
वडीगोद्री येथील खासगी शाळेतील शिक्षक संजय यांचे कुटुंब पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे राहते. पत्नी वर्षा यांचे या बीड बायपास परिसरातील आई-वडील व भावाला भेटण्यासाठी आल्या होत्या. मंगळवारी त्या गावाकडे जाणार हाेत्या. त्यांना घेण्यासाठी संजय दुचाकीवरून आले. सासरच्यांना भेटून ते सायंकाळी ५.३० वाजता गावाकडे निघाले. मात्र नक्षत्रवाडी जवळ पैठणकडून एक खडीचा हायवा येत होता आणि दुसऱ्या बाजूने पैठणकडे एक बलेनो कार जात होती. यावेळी हायवाने बलेनो कारला जोराची धडक दिली. या धडकेत संबंधित कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. मात्र याचवेळी अपघातग्रस्त हायवाने संजय यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, हायवाने संजय यांच्या गाडीला धडक दिल्यावर त्यांची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली. या भीषण अपघातात संजय आणि त्यांचा मुलगा समर्थ दहिफळेचा जागीच मृत्यू झाला. तर संजय यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.
पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाला पगार !
वडगोद्री येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात संजय दहिफळे हे 2008 पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांना पगार सुरू झाला नव्हता. पुढे 2018 मध्ये त्यांना अनुदानासाठी मान्यता मिळाली. मात्र प्रत्यक्षात पगार हाती आला नव्हता. दरम्यान मार्च महिन्याच्या पहिलाच 15 हजार रुपये पगार दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांनी मिळालेला पगार त्यांनी बँकेतून काढलाही नव्हता, पण त्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.