रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह मनहास यांची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. राकेश्वर मनहास यांचं ३ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं, त्यानंतर ६ दिवसांनी त्यांना सोडलं आहे.
नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह मनहासला सोडलं आहे. राकेश्वर सिंहला रुग्णवाहिकेतून विजापूर येथे आणण्यात आले आहे. राकेश्वर यांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
कोब्रा जवान राकेश्वर मनहार ६ दिवसांनंतंर नक्षलवाद्याच्या तावडीतून सुटले आहे. त्यांना सरकारने गठीत केलेल्या २ सदस्यीय मध्यस्थ पथकाच्या स्वाधीन केलं. यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पद्मश्री धर्मपाल सैनी आणि गोंडवाना समाज अध्यक्ष तेलम बोरैया हे या पथकात होते. जवानासह सर्व जण आता बासागुडा येथे पोहोचणार आहेत.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बीजापुर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत २२ जवान शहीद झाले. पण माओवाद्यांनी या चकमकीत २४ जवान ठार झाल्याचा दावा केला. तसंच अपहरण केलेले जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावाही माओवाद्यांनी केला होता.