चंद्रपूर (वृत्तसंस्था) नवी बुलेट खरेदी करून मोठ्या खुशीत आईसोबत मुलगा घरी निघाला. बुलेटच्या मागे वडील आणि भाऊही कारमधून मोठ्या आनंदाने प्रवास करीत होते. तशातच कोरी करकरीत असूनही बुलेट वारंवार बंद पडत होती, पण तिसऱ्यांदा बुलेट बंद पडल्यानंतर मात्र, क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि भीषण अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले… कल्पना रमाकांत कड्यालवार (५५), साहिल रमाकांत कडालवार (रा. सिंदेवाही) अशी मृत मायलेकांची नावे आहेत.
सिंदेवाही येथील रमाकांत कड्यालवार हे दोघं मुले आणि पत्नीसह शनिवार (दि.२०) रोजी नागपूरला गेले होते. मुलास दुचाकी विकत घ्यायची होती तर त्यांना दवाखान्याचे काम होते. नागपूरवरून ते रात्री ८ वाजेच्या सुमारास संपूर्ण परिवार सिंदेवाहीच्या दिशेने निघाले. यावेळी रमाकांत यांचा लहान मुलगा साहिल याने नवीन बुलेटवर आईला सोबत घेतले तर मोठा मुलगा समीर हा वडील रमाकांत यांच्यासह कारमध्ये बसला. बुलेट मागे कार असा परिवाराचा प्रवास मोठ्या आनंदाने सुरु होता.
तशातच नवीन असूनही बुलेट वारंवार बंद पडत होती. दोन वेळेस बुलेट बंद पडल्यानंतर पुन्हा सुरु झाली. रात्री ११ वाजेच्या सुमारास तळोधी- बाळापूर जवळील बोकोडोह नदीवर पुन्हा बुलेट बंद पडली. त्यामुळे मायलेक पुन्हा एकदा थांबून नेमकं काय झालं हे बघण्यासाठी थांबले. मागे येणारी कार देखील वडील आणि भाऊने थांबवली. याचवेळी मागून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने पुलावर उभ्या असलेल्या बुलेट आणि कारला जोरदार धडक देत पसार झाला. या धडकेने बुलेटजवळ उभे असलेला साहिल आणि आई कल्पना पुलाखाली पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये बसलेल्या रमाकांत यांच्या पायाला जबर दुखापत झाली. मोठा मुलगा समीर याने तातडीने पोलिसांना ही माहिती दिल्याने पोलिस आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी आले व रमाकांत यांना नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.