सोलापूर (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर लागला असून पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा असल्याचं सोमय्या म्हणाले.
सचिन वाझेवर झालेल्या कारवाईत पाच अधिकारी निलंबित झाले आहेत. परमबीर सिंग घरी गेले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. आता सध्या अनिल परबांचा नंबर असून त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल असा दावा सोमय्यांनी केला. भाजप उद्धव ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल, असंही सोमय्या म्हणाले. राज्यातील सरकारनं खुशाल पाच वर्षे पूर्ण करावी. पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करणार असल्याचं सोमय्या म्हणाले. हे सरकार पाच वर्ष टिकावं मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणारं आहे असं ही सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत, संजय राऊतांना तोडीचे ५५ लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे असं ही सोमय्या यावेळी म्हणाले आहेत. अनिल परब,अनिल देशमुख यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड हे आता लाईनीत आहेत. त्यामुळं “आगे आगे देखो होता हैं क्या” असं म्हणत सोमय्यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांना ही डिवचलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा एवढा घमंड करू नये, जालन्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना पाच पोलिसांकडून जी मारहाण झाली ती निंदनीय आहे. त्यातील चार पोलीस निलंबित झाले आहेत. त्याचबरोबर याप्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी व्हायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.