जळगाव (प्रतिनिधी) जळगावनंतर रावेर लोकसभा मतदार संघातही मोठं राजकीय धक्कातंत्र बघावयास मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण शिवसेना ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने अंतर्गत नाराजीनाट्यांतून भाजपाचा निष्ठावंत घराण्याचा युवा चेहरा हेरला असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शरद पवार खेळणार ‘लेवा कार्ड’ !
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून खा.रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे ‘मविआ’मध्ये ही जागा राष्टवादी कॉँग्रेस शरद पवार गटाला गेली आहे. शरद पवार यांनी या जागेचा उमेदवार अद्यापही घोषीत केलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मतदारसंघात शरद पवारांची मोठी खेळी सूरु केली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघ पाठोपाठ भाजपाला धक्का देत रावेर लोकसभा मतदारसंघातही धक्कातंत्र अवलंबत भाजपाचा निष्ठावंत घराण्याचा युवा चेहऱ्याला संधी देत ‘लेवा कार्ड’ वापरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
मुंबईत झाली गुप्त बैठक !
भाजपाच्या निष्ठावंत घराण्यातील एका परिवारावर सातत्याने अन्याय होत असल्याने त्या युवा चेहऱ्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. परंतू भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन यांनी बंड शांत केले होते. पण आता हाच संबधित युवा चेहरा खा.शरद पवार यांनी हेरला आहे. आमदार रोहित पवार व जिल्हयातील एका नेत्यामार्फत संबंधित युवा नेत्यासोबत एक गुप्त बैठक दोन दिवसापूर्वीच मुंबईत झाली असल्याचे कळते. यात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
…म्हणून राष्ट्रवादीने उमेदवाराची घोषणा लांबवली !
विशेष म्हणजे गुरुवारी रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार शरद पवार गटाकडून जाहीर होणार होता. परंतू नवीन राजकीय समीकरण जुळत असल्यामुळे उमेदवाराची घोषणा लांबवली असल्याची चर्चा आहे. संबंधित युवा नेत्याने तुतारी चिन्ह घ्यावे. अगदी टोकाचीच अडचण असेल तर राष्ट्रवादी समर्थन देईल. संबंधित युवा नेत्याने तुतारी चिन्ह घेऊन उमेदवारी केल्यास लेवासह मराठा, मुस्लीम आणि मागासवर्गीयांची एकगठ्ठा मते मिळतील आणि त्यातून विजयाचे गणित साकार करता, येईल अशी प्राथमिक रणनीती आखण्यात आल्याचे कळते.
उन्मेष पाटील यांच्या बंडानंतर युवा नेत्यावर वाढला दबाव !
दरम्यान, वडिलांपाठोपाठ आपल्यावरही राजकीय अन्याय होत असल्याची भावना या युवा चेहऱ्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये बळावली आहे. तशात उन्मेष पाटील यांनी बंड करत वेगळी भूमिका घेतल्यामुळे या युवा नेत्यावरवरही समर्थकांचा प्रचंड दबाव वाढत असल्याचे कळते. ज्या पद्धतीने भाजपमधील राजकीय भवितव्य संपल्याची खात्री झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्याच पद्धतीने रावेर लोकसभा मतदार संघात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्यातून होणारे संभाव्य प्रवेश लक्षात घेता संबंधित युवा नेत्यानेही वेगळा होण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी समर्थक आग्रही आहेत. जर खरोखर हा भाजपाच्या हा युवा चेहरा शरद पवार यांच्या गळाला लागला तर भाजपाला जळगाव जिल्ह्यात पुन्हा एक मोठा धक्का बसेल, यात शंका नाही.