जळगाव प्रतिनिधी) शहरातील हॉटेल महेंद्रा नजीक सार्वजनीक जागी राडा घालणारे दोघं जण पती-पत्नी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी सागर राजगिरे व सागर भिकन राजगिरे (दोघे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव), असे संशयित आरोपींचे नाव आहे.
जळगावातील हॉटेल महेंद्रा नजीक सार्वजनीक जागी भर दुपारी हमरस्त्यावर मोठमोठ्याने वाद घालून एकमेकांना शिवीगाळ करणाऱ्या दाम्पत्याचा अनेकांनी व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. या व्हिडीओमध्ये एक तरुणीला समोरच्या तरुणावर चाकूने हल्ला करत असल्याचे दिसत होते. परंतू हे दोघं जण कोण? आणि त्यांच्यात कशावरून वाद सुरु होता?, हे समोर आले नव्हते. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात होते. चाकू हल्ला करणारी तरुणी किंवा जखमी तरुण या दोघांपैकी कुणीही पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास आले नव्हते.
सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनीक जागी वाद घालून मोठमोठ्याने ओरडून शांतता भंग करणाऱ्या दोघांचा एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास केला असता, दोघेही पती-पत्नी असल्याचे उघड झाले आहे. माधुरी राजगिरे व सागर राजगिरे असं दाम्पत्याचं नाव आहे. दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला भा.द.वि.160 मुंबई पोलीस कायदा कलम 112, 117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील व महिला पो.कॉ. मिनाक्षी घेटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. कारवाई करण्यात आलेल्या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाल्याची माहिती देखील पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दोघांमध्ये कौटुंबिक वादातून राडा झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.