पाचोरा (प्रतिनिधी) फार्मसीच्या द्वितीय वर्ष सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे आनंदात घरी निघाला. पण रिक्षातून प्रवास करताना ट्रॅक्टरच्या लोंबकळणाऱ्या हुक शर्टला अडकला आणि त्यात तरुण ओढला जाऊन ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना नगरदेवळा स्टेशन रोडवर गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. रूपेश राजेंद्र पाटील (२०) असे या तरुणाचे नाव आहे. तो जळगाव येथे फार्मसीचे शिक्षण घेत होता.
द्वितीय वर्ष सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे रुपेश गुरुवारी मोठ्या आनंदाने घरी येत होता. नगरदेवळा स्टेशनहून तो नगरदेवळ्याकडे रिक्षाने जात होता. समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रॅक्टरने रिक्षाला जवळून कट मारला. त्यावेळी रिक्षात बाजूला बसलेल्या रूपेश याच्या शर्ट आणि चेहऱ्याला ट्रॅक्टरचा लोंबकळणारा हूक अडकला त्यामुळे रुपेश रिक्षातून खाली पडला आणि जखमी झाला. त्याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. अत्यंत हुशार असलेल्या रूपेशचे आई-वडील शेतकरी असून, भाऊ गॅरेजचे काम करतो. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी नगरदेवळा दूरक्षेत्र आणि ग्रामपंचायत कार्यालयास निवेदन दिले.
 
	    	
 
















