यावल (प्रतिनिधी) भाजपाकडून रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना जाहीर झाली आणि त्यानंतर यावल – रावेर तालुक्यातील मोठ्या संख्येत ‘ना -राजीनामा’ सत्र सुरु झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
सामूहिकरित्या राजीनामा देण्यास सुरुवात !
रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे. अगदी असंख्य कार्यकर्ते हे भालोद या गावात भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले व त्यांनी त्यांच्याकडे सामूहिकरित्या राजीनामा देण्यास सुरुवात केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुमारे ७०० हुन अधिक पदाधिकारी भालोद गावात दाखल झाले आणि त्यांनी आपली नाराजी प्रकट करतांना पक्षाकडून सातत्याने जावळे कुटुंबावर अन्याय होत असल्याचे सांगत पुर्वी स्व.हरिभाऊ जावळे यांच्या संदर्भात जे झालं तेच अमोल जावळे संदर्भात होत असल्याचा सूर व्यक्त केला. पक्षात काम करून काय फायदा ? असे सांगत आपल्या संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. सायंकाळनंतर भाजपाच्या अनेक सोशल मिडीया ग्रुपमध्ये पक्षाच्या भूमिकेबाबत रोष व्यक्त होताना दिसून आला.
कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट !
लोकसभा निवडणुकीकरिता भाजपाकडून बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव जाहीर झाले. सायंकाळी त्यांच्या नावाची बातमी कळताच यावल आणि रावेर तालुक्यातील भाजपाचे जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यांमध्ये संतापाची जणू लाटचं उसळली. मोठ्या संख्येत कार्यकर्ते हे भालोद या गावात दाखल झाले आणि त्यांनी सामूहिकरित्या आपले राजीनामे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्याकडे सादर करून आपला संताप व्यक्त केला.
याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, भाजपा सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, भाजपा ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, फैजपूर माजी नगराध्यक्ष पांडूरंग सराफ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, व्यंकटेश बारी सह भाजपाचे जेष्ठ व युवा सह विविध आघाड्यांचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी सामुहिक राजीनामे दिले आहे.
खडसे परिवारावरचं प्रेम का?
एकनाथराव खडसे हे पक्षात असतांनादेखील विद्यमान खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी कापण्यात आली होती व तेव्हापासून रक्षा खडसे या खासदार आहेत. पक्षासाठी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करतांना स्वर्गीय जावळे यांनी रक्षा खडसेंचा प्रचार केला मात्र अन्याय सहन करून पक्षाचा झेंडा हातात सन्मानाने धरून चालणाऱ्या कार्यकर्त्याच्या पदरी शेवटी निराशा टाकायची का? असा प्रश्न उपस्थित करत शेकडो कार्यकर्त्यांनी जावळे परिवारावर होत असलेल्या अन्यायाबद्दल पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
जावळेंकडून नो रिप्लाय
मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भालोद गावात जमले होते. त्या ठिकाणी गेलेल्या पत्रकारांना फोटो काढण्यास अमोल जावळे यांनी स्वत:च मनाई केली व कार्यकर्त्यांची समजूत ते काढतांना दिसले. मात्र कार्यकर्त्यांनी जावळे यांना त्यांच्या वडिलांचे स्व. हरिभाऊ जावळे यांची आठवण करून देत सातत्याने कशा पद्धतीने तुमच्या कुटुंबांवर अन्याय होत आहे हे सांगून आपली भूमिका बदलवण्यासाठी आग्रह केला. अनेक कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत भालोद गावात थांबूनच होते.
नाराजी लवकरच दूर होईल : मधुकर राणे !
जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अमोल जावळे यांच्या संपर्कामुळे अनेक कार्यकर्त्यानासुद्धा जावळे यांना या वेळी उमेदवारी मिळावी अशी इच्छा होती. आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर मतदारसंघात जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी जावळे यांनी जिल्हाध्यक्षपद मिळाल्यावर बरेच प्रयत्न केले. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे वाटत होते. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झालेत व त्यांनी आपले राजीनामे दिलेत. या सर्व कार्यकर्त्यांशी जावळे हे संपर्कात असून राजीनामे मागे घ्यावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी कार्यकर्त्यांनी चर्चा करावी यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असल्याचे समजते. या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यास ते यशस्वी ठरतात का?, हे पहावे लागेल. कारण अनेक कार्यकर्ते हे रक्षाताई खडसे यांच्या कार्यशैलीबद्दल सुद्धा नाराज आहेत. बोदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नाराजी लवकरच दूर होईल व भाजपचे केंद्रात प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार आणण्यासाठी पक्षाचे काम हे लोक करतील, असा विश्वास बोदवड तालुकाध्यक्ष मधुकर राणे यांनी व्यक्त केला आहे.