धुळे (प्रतिनिधी) म्हसदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा शेतात सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना काल (दि. २१) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. राज अनिल नेरे (वय ९), असे मयत बालकाचे नाव आहे.
येथील राज अनिल हा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आजी, आजोबा व आई सोबत शेतात गेला होता. शेतात कपाशी गोळा करण्याचे काम नेरे परिवारासह मजूर वर्ग करीत होता. तर राज हा शेतात खेळत होता. खेळत असताना अचानक त्याला सर्पदंश झाला. ही घटना शेतात काम करणाऱ्या आजी आजोबांना समजताच त्यांनी राज यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यास साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी गेला दिला. त्यानुसार साक्री येथे नेत असतानाच वाटेतच राज याचा मृत्यू झाला.
राज हा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो वर्गात अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्यामुळे या घटनेची माहिती सजताच शिक्षकांचे अश्रू अनावर झाले. तर नेरे कुटुंबियांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.