यावल (प्रतिनिधी) आपल्या सासुरवाडीला भेट देऊन बहिणीकडे निघालेल्या भाऊचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यावल-फैजपूर रस्त्यावर सांगवी ते हिंगोणा गावादरम्यान घडली. भीमराव बाळू पांडव (वय ३५, रा. म्हैसवाडी ता. यावल), असे मयत तरुणाचे नाव आहे.
भीमराव पांडव याने आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच. १९ – ईबी. ४७९१) आधी सांगवी गावात आपल्या सासुरवाडीला भेट दिली. त्यानंतर यावल- फैजपूर मार्गावरून सांगवी मार्गे मारूळ गावातील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात होता. परंतू सांगवी ते हिंगोणा गावादरम्यान रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण धडकेत भीमराव पांडव यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी भीमराव पांडव यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. मृताच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, मयत भीमराव यांच्या कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता.
















