धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मोठा माळी वाडा परिसरातील नव्याने बांधलेले सार्वजनिक शौचालय रात्री अचानक महिलांनी स्वत: सुरु करून घेतले. विशेष म्हणजे आज सकाळी या शौचालयाचे उद्घाटन होणार होते.
धरणगाव मोठा माळी वाडा परिसरातील शेतकरी वर्ग असल्यामुळे रोज सकाळी उठून शेतात कामाला जावे लागते. अनेक दिवसापासून त्यांना शौचास उघड्यावर बसावे लागत होते. धरणगाव नगर परिषदकडे वारंवार तक्रार करून देखील नगरपालिका प्रशासनाने यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. एवढेच काय १६ जुलै २०२२ रोजी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळने पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी गुलाबराव वाघ यांनी लोकांच्या सहनशीलेता अंत झाला आहे. नागरिकांची सोयी महत्त्वाचे आहे, असे सांगत दोन दिवसात कुलूप खोलून करा नाही तर, आम्ही खोलू असा दम प्रशासनाला दिला होता. भाजपने देखील याबाबत निवेदन देत शौचालय सुरु करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. यानंतर सोमवारी रात्री अचानक परिसरातील महिला आक्रमक झाल्या. या त्रस्त महिलांनी शेवटी स्वता:हून जाऊन कुलूप तोडून आपला निर्णय घेतला आणि शौचालय सुरु केले.