छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) तुझ्या अंगात आत्मा घुसल्याने मूलबाळ होत नसल्याचे सांगून एका विवाहितेवर जामगाव (ता. गंगापूर) येथील एका मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली अघोरी प्रयोग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मांत्रिकाचा छळ व असह्य त्रासाला कंटाळून महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी हकीम मुक्तार शेख, त्याची आई आबेदा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाला १३ वर्षे होऊनही मूलबाळ होत नव्हते !
गंगापूर शहरातील एका ३५ वर्षीय पीडितेने पोलिसांसमोर मांत्रिकाने केलेल्या अघोरी उपचाराची आपबिती सांगितली. ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या लग्नाला १३ वर्षे होऊन गेली, तरी तिला मूलबाळ होत नव्हते. त्यासाठी तिने व तिच्या पतीने अनेक उपाय, उपचार केले; पण यश येत नव्हते. २०२२ मध्ये नात्यातील जामगाव येथील आबेदा शेख या महिलेने तिच्या पतीची भेट घेऊन सांगितले की, माझा मुलगा हकीम मुख्तार शेख यास दैवी शक्ती प्राप्त असून, त्याला भूतबाधा, करणी तसेच काळी जादू समजते. ‘तू एकदा तुझ्या बायकोला त्याच्याकडे पाठवून बघ’ असे सांगितले. पतीने पत्नीला हकीमच्या घरी नेले. तेथे हकीमने आपल्या घरात तिला मंत्रतंत्र करत मध्यभागी मातीचे कुंड पेटवले. जादूसाठीचे साहित्य मांडून मंत्रतंत्र म्हणत त्याने ‘तुझ्या अंगात आत्मा शिरला असून, त्यामुळेच तुला मूलबाळ होत नाही’ असे सांगितले. त्यानंतर मी मंत्रोच्चाराने आत्मा नाहीसा करतो, असे सांगत कुंडातील राख महिलेच्या अंगाला लावून तिला परत पाठवून दिले. त्यानंतर प्रत्येक वेळी हकीम शेख हा विवाहितेवर वेगवेगळ्या प्रकारे मंत्रोच्चार करून सुया टोचलेली बाहुली अंगावरून उतरवून तिला मारहाण करायचा. आपल्याला आज ना उद्या मूलबाळ होईल, या आशेने पीडिता हा त्रास सहन करत होती.
पाठीत व मांडीला खिळे टोचले
मांत्रिकाने वरील प्रकारे तब्बल दोन वर्षे तिच्यावर उपचार व अघोरी प्रयोग केले. १८ एप्रिल रोजी तर हकीमने कहरच केला. त्याने महिलेला अघोरी उपचाराच्या नावाखाली चक्क पाठीत व मांडीला खिळे टोचले. त्याच्या वेदना असह्य झाल्याने तिने पतीकडे पाहून आरडाओरड केली; पण मांत्रिकाने पतीला मदतीला येऊ दिले नाही. यावेळी हकीमची आई आबेदाने जवळच पडलेल्या मिरच्या पीडितेच्या तोंडात कोंबल्या. या मारहाणीनंतर तिला चालताही येत नव्हते.
माहेरच्या लोकांनी दिला धीर
दुसऱ्या दिवशी पीडिता माहेरी गेल्यावर तिने आपबिती सांगितली. तिची अशी अवस्था पाहून माहेरच्या लोकांनी तात्काळ गंगापूर पोलीस ठाणे गाठून सदर प्रकरणी फिर्याद दिली. यावरून आरोपी हकीम मुक्तार शेख व त्याची आई आबेदा शेख (रा. जामगाव) यांच्या विरोधात गुरनं २१२/२४ कलम ३२४, ३२३, ३४ भा. दं. वि. सह कलम ३ (१) (२) (३) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.