अहमदाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात रुग्णालयातील दुर्घटनांच्या घटना ताज्या असतानाच, शेजारी असलेल्या गुजरात राज्यातही रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली. भरुच येथील एका कोविड केअर सेंटरला भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. येथील पटेल वेलफेअर रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला रात्री १२.३० च्या सुमारास ही आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री १२.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली होती. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर काही रुग्ण गंभीर जखमी झाले होते.