नाशिक (वृत्तसंस्था) बलात्काराचा गुन्हा दाखल करून आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पीठाच्या विश्वस्तांकडून खंडणी मागणाऱ्या विभागातील कृषी सहायक महिलेस १० लाख रुपयाची खंडणी घेताना तिच्या मुलासह पोलिसांनी शनिवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. संबंधित महिलेने २०१८ पासून आतापर्यंत एक कोटीहून अधिकची रक्कम उकळी असल्याचेही समोर आले आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मोबाइल फोनचे तांत्रिक विश्लेषण यांच्या माध्यमातून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी रविवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत दिली.
काय आहे नेमके प्रकरण?
दिंडोरी व त्र्यंबकेश्वर येथील अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळावर कार्यकारी सदस्य असलेले निंबा मोतीराम शिरसाट (वय ५४, मूळ रा. देवळा) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित महिला सारिका सोनवणे आणि त्यांचा मुलगा मोहित सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप, महागडा मोबाइल, खंडणी म्हणून स्वीकारलेल्या १० लाख रुपयांसह घरझडतीतूनही १० लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सारिका व शिरसाट यांची २०१४ मध्ये ओळख झाली होती. दोघेही देवळा तालुक्यातीलच रहिवासी आहेत. संबंधित महिलेने आजारपण, शेती, मुलांचे शिक्षण अशी कारणे सांगून २०१९ मध्ये प्रथम २५ लाख रुपये शिरसाट यांच्याकडून घेतले जानेवारी २०२३ मध्ये महिलेने फिर्यादी शिरसाट यांना भेटून मोबाइलमधील काही व्हिडीओ दाखविले व पुन्हा २० कोटी रुपयांची मागणी करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीला घाबरून ५० लाख रुपये महिलेस देण्यातही आले. त्यानंतरही तिने १० कोटी ५० लाखांची मागणी केली. तेव्हा मात्र निंबा शिरसाट यांनी पोलिसांकडे तक्रार दिली
आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी !
संशयित महिलेकडे प्रारंभी या संस्थांच्या सिडकोतील शाखांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. अलीकडेच त्यांच्याकडे कळवण, मालेगाव, सटाणा आणि देवळा या तालुक्यांमधील ४० शाखांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. २०१५ पासून शिरसाठ आणि सोनवणे यांची ओळख असून, सोनवणे यांचा सेवाभाव पाहून त्यांच्याकडे केंद्राशी संबंधित जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. आपल्याकडे काही आक्षेपार्ह व्हिडिओ असून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी संशयित महिलेकडून शिरसाट यांना दिली जात होती. हे व्हिडिओ व्हायरल करू नये, याकरिता तिच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली जात होती. आतापर्यंत तिला एक कोटी पाच लाख रुपये दिल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.