वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. नव्या कृषी कायद्याविरोधात पेटलेल्या आंदोलनाचे पडसाद आता अमेरिकेतही उमटू लागले आहेत. शनिवार, १२ डिसेंबर रोजी वॉशिंग्टन डीसी बाहेरील महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. आंदोलकांनी पुतळ्यावर खलिस्तान ध्वज फडकविला.
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात अमेरिकेत शनिवारी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी खलिस्तानी समर्थकांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यावेळी खलिस्तानचे झेंडेही फडकण्यात आले. या आंदोलकांकडून पुतळ्याच्या चेहऱ्यावर खलिस्तानचा झेंडा गुंडाळण्यात आला. वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाबाहेर हा सारा प्रकार घडला. दरम्यान, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अमेरिकन कायदा अंमलबजावणी करणार्या एजन्सींकडे तीव्र निषेध नोंदविला आहे. तसंच लागू कायद्यान्वये दोषींची चौकशी आणि कारवाई यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडेही मागणी केली आहे. “काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांकडून अशाचप्रकारची निदर्शने करण्यात आली होती. तेव्हादेखील खलिस्तानवाद्यांकडून मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. मात्र, आता खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारताकडून या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भारतीय दूतावासाकडून अमेरिकी सुरक्षा यंत्रणांकडे यासंदर्भात तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. अमेरिकी यंत्रणांनी तातडीने हालचाली करुन दोषींवत कारवाई करावी, अशी मागणी भारतीय दूतावासाकडून करण्यात आली आहे.
पत्रकारांशी बोलताना शेतीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या संयोजकांपैकी एकाने म्हटले, “प्रत्येकाला आत्मनिर्णयाचा हक्क आहे. तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहात, हे महत्त्वाचे आहे. पुढे ते म्हणाले की, भारतातील पंजाब मधील शेतकरी कृषी कायद्याविषयी आवाज उठवत असताना सरकार त्यावर काहीच उत्तर का देत नाही. शिखांनी आतापर्यंत कधीच कोणाला त्रास दिलेला नाही आणि याची जगाच्या इतिहासात नोंद आहे. त्यामुळे आपण त्यांना कोणत्याही बाजूने दहशतवादी म्हणू शकत नाही.