वडीगोद्री (वृत्तसंस्था) इथे कोणीही येऊ शकतात, येथे आलेले लोक आमचे पाहुणे असतात. अशावेळी मला इथे मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते. मी जातीयवादी नाही. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलं तर त्यांचे कौतुक का करू नये, असे म्हणत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत झालेल्या भेटीवर भाष्य केले.
भल्या पहाटे झालेल्या चर्चेत काही विशेष नव्हते, मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे जरांगे-पाटील म्हणाले. मात्र, मी माझ्या मुद्यावर ठाम असून, जीवात जीव आहे तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेवर कायम ठाम असल्याचेही ते म्हणाले. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी भल्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी जरांगे-पाटील यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली.
चर्चेनंतर पत्रकारांनी जरांगे यांच्याशी संवाद साधून मंत्री मुंडे यांच्या भेटीविषयी विचारल्यानंतर जरांगे यांनी शेतकरी प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगितले. ज्यावेळी आरक्षणाच्या मुद्यावर आमची चर्चा झाली, त्यावेळी मंत्री मुंडे हे व्यासपीठावरच उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्याशी वेगळी चर्चा करण्याची गरज नाही. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जनावरांचा बळी गेला आहे, अनेक घरे कोसळली आहेत. याबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आमची चर्चा झाली. मी कोणाचाच होऊ शकत नाही. ना महाविकास आघाडी, ना महायुतीचाही नाही. मी फक्त मराठ्यांचा असून, आमच्याकडे आयतं मैदान आहे. आम्हाला तयारी करण्याची गरज नसून उद्या जरी निवडणूक लागली, तरी आमची तयारी असल्याचे ते म्हणाले.