नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली सर्वश्रेष्ठ बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळेच आता एअर इंडिया कंपनीची मालकी पुन्हा एकदा जवळजवळ सात दशकांनंतर एअर इंडिया कंपनी मूळ मालकांच्या ताब्यात जाणार आहे.
मोदी सरकारने जुलै २०१७ मध्ये एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून ती विकत घेण्याचा अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियाला आज नवीन मालक मिळाला. एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली कोणी लावली याबाबत डीआयपीएएम सचिव आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव पत्रकार परिषद घेत माहिती दिलीय.
निर्धारित राखीव किमतीच्या आधारावर वित्तीय निविदांद्वारे लावण्यात आलेल्या बोलीचे मू्ल्यमापन करण्यात आले असून, सर्वाधिक बोली ‘टाटा सन्स’कडून आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले होते. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणुकीसाठी स्थापन केलेल्या सचिवस्तरीय समितीकडून तपासणीही पूर्ण करण्यात आल्यानंतर टाटांची निवड करण्यात आली. त्यांनी आपली शिफारस अंतिम निर्णयासाठी ‘एअर इंडिया’च्या खासगीकरणासाठी स्थापण्यात आलेल्या शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिगटाकडे सादर केल्यानंतर त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलाय.
एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम (एआयएसएएम) पॅनलने एअर इंडियाच्या आर्थिक बोलीवर निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी या पॅनलमध्ये समाविष्ट आहेत. डीआयपीएएमचे सचिव तुहिनकांत पांडे म्हणाले की, अनेक वेळा बोलीसाठी अर्ज मागवण्यात आले होते, पण शेवटी सप्टेंबरमध्ये दोन बिडर्सची नावे निश्चित करण्यात आली. एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जाईल. या घटनांचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.