नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर आता केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळातून अजय मिश्रा यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लखीमपूर हिंसाचार प्रकरणाने वातावरण तापलं आहे. लखीमपूर प्रकरणी आशिष मिश्रा हा मुख्य आरोपींपैकी एक आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा यांचा मुलगा आहे. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचण्यात आला, असं या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या मुद्द्यावरून सरकारला संसदेत विरोधकांच्या आरोपांचा सामना करावला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चर्चेसाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.
‘लखीमपूरमधील शेतकऱ्यांचे हत्याकांड हा पूर्वनियोजित कट होता आणि काही निष्काळजीपणा नव्हता. सरकारने गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे आणि पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला पाहिजे’, असं राहुल गांधी म्हणाले. लखीमपूर हत्याकांडमध्ये कोणाचा मुलगा अडकला आहे हे सर्वांना माहिती. आम्ही याप्रकरणी संसदेत चर्चेची मागणी केली. पण पंतप्रधानांनी नकार दिला. सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतंय. आम्ही सरकार किती दबाव आणतोय, यावर सर्वकाही अवलंबून आहे. गुन्हेगार मंत्रिपदावर राहणार नाही, याची आम्ही नक्कीच खात्री करू. पीडित कुटुंबीयांना आम्ही न्याय मिळवून देऊ. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असं आम्ही म्हणालो होतो. सर्वांच्या दबावापुढे सरकार झुकले आणि कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असं राहुल गांधी म्हणाले.